Saturday 6 April 2013

प्रज्ञारेखन २



मेंदूचे विविध भाग वेगवेगळी कार्ये करतात हे जवळजवळ जगभर मान्य झाले आहे. मानवी प्रज्ञेची विविध रूपे आपण पहिल्या लेखात पाहिली. उजवा अर्धगोल हा अमूर्त संकल्पना, प्रतिभा किंवा सर्जनशीलता यात जास्त कार्यक्षम आहे असे मानले जाते. भाषा, तार्किकता, मूर्त संकल्पना, गणिती संकल्पना, इ. बाबतीत डावा मेंदू जास्त कार्यक्षम आहे असे मानले जाते. म्हणजे गणिताचा किंवा विज्ञानाचा, तार्किक संकल्पनांचा अभ्यास करतांना फक्त डावा मेंदू वापरला जातो. म्हणजे उजव्या बाजूची कार्यक्षमता या विषयाचा अभ्यास करतांना वाया जाते. म्हणून प्रज्ञारेखन पद्धतीत विविध रंग आणि प्रतीके, प्रतिमा, शतिमा - Wimage - (शब्द + प्रतिमा = शतिमा, Word + Image = Wimage) यांचा वापर केला. त्यामुळे हे विषय शिकतांना मेंदूचा उजवा भाग देखील काम करतो. साहाजिकच विषय जास्त स्पष्टपणे समजतो. आणि जास्त काळ लक्षात राहातो. कागद आडवा धरल्यामुळे विषय जास्त व्याप्तीने एकाच कागदावर येतो. मांडलेल्या विषयाचे विहंगावलोकन करता येते. इतर फायदेतोटे माझ्या मागील प्रतिसादात आले आहेत. त्यामुळे बुझान यांचे माईंड मॅपिंगच्या उपयुक्ततेचे बहुतेक दावे मान्य करायला हरकत नाही. तरी हा बराचसा प्रशिक्षणाचा आणि स्वयंसरावाचा मुख्य म्हणजे इछेच्या तीव्रतेचा भाग आहे.
 
मेंदूचा जास्तीत जास्त आणि प्रभावी उपयोग करण्यासाठीं कल्पनाशक्ती, रंगांचा वापर आणि त्रिमिती वस्तुरचना यांची सांगड घालून टोनी बुझान यांनींमाईंड मॅपिंगनांवाची अभ्यासप्रणाली विकसित केली. त्याअगोदर कॉन्सेप्ट मॅपिंग वगैरे प्रणाली अस्तित्त्वात होत्या. काही विशिष्ट वापरासाठी इशिकावाने विकसित केलेली फिश बोनसारखी कॉझ ऍंड इफेक्टप्रारूपे विकसित झाली. पारंपारिक अध्ययनपद्धतींशीं तुलना करतां माईंड मॅपिंगमध्येआठवण्याची प्रक्रिया’ (प्रोसेस ऑफ रीकॉल) लक्षणीय रीत्या सुधारल्याचें विविध प्रयोगांत आढळलें आहे. परंतु या माईंड मॅपिंगसारख्या समाजोपयोगी अध्ययनप्रणालीचें त्यांनीं इंग्लंड आणि अमेरिकेंत एकाधिकार हक्क अर्थात पेटंट आणि कॉपीराईट घेतल्यामुळें जगभर त्यांच्याविरोधांत वातावरण निर्माण होऊन त्यांच्याविरुद्ध जाणारे असंख्य टीकाकार निर्माण झाले आहेत. असें जरी असलें तरी माईंड मॅपिंगची उपयुक्तता आणि पारंपारिक प्रणालीपेक्षां या पद्धतींत मिळणारे फायदे यांचें महत्त्व जराही कमी होत नाहीं. फक्त पद्धतशीर प्रशिक्षण घेण्याची जरूरी आहे. प्रथम टोनी बुझान यांचे कार्य खरोखरच लक्षात घेण्याच्या तोडीचे आहे की काय हे पाहाण्यासाठी प्रथम त्यांच्या कार्याचा आढावा घेऊ. बुझान यांचे व्यक्तिस्तोम वाढवणे वगैरे माझा उद्देश नाही.

टोनी बुझान यांनीं मेंदूच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करून स्मृतीचा विकास कसा करावा यावर बरेंच संशोधन केलें आहे. १९८४ सालीं त्यांना फ्रीमन ऑफ लंडन हा किताब मिळाला. मेक्सिकोंत केलेल्या शिक्षणशास्त्रांतील उत्कृष्ट कार्याबद्दल २००५ सालीं मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष व्हिन्सेण्ट फॉक्स पारितोषिक. २००८ सालीं अमेरिकन क्रीएटिव्हिटी असोसिएशन फॉर सर्व्हिसेस टु ग्लोबल क्रीएटिव्हिटी ऍंड इनॉव्हेशनचें जीवनगौरव - लाईफटाईम अचिव्हमेंट - पारितोषिक इ. मानसन्मानांनीं ते गौरवांकित झालेले आहेत.

१९७० मध्यें बीबीसीवरच्या एका मालिकेंत त्यांनीं स्मृतीचा (मेमरी) वापर कसा करावा, मेंदूचा जास्तीत जास्त उपयोग कसा करावा, जलदवाचन किंवा वेगवान वाचन (स्पीड रीडिंग) कसें करावें इ. गोष्टीवर विचार मांडले. मानसशास्त्रावरील लेखनांत त्यांनीं बरीच लोकप्रियता मिळवली. प्रज्ञांक (जीनीअस कोशंट - जीक्यू), अध्यात्मिक प्रज्ञा (स्पिरीच्युअल इंटेलिजन्स), स्मृती, सर्जनशीलता आणि वेगवान वाचन या विषयांवर त्यांनीं लेखन केलेलें आहे. वैद्यकीय विषयातील नसलेल्या ब्रेन फाउंडेशनचे तसेंच ब्रेन ट्रस्ट चॅरिटीचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. जागतिक स्मृती प्राविण्य (वर्ल्ड मेमरी चॅंपियनशिप) तसेंच जागतिक प्रज्ञा प्राविण्य (वर्ल्ड चॅंपियनशिप ऑफ द ब्रेन) भरवण्यांत ते अग्रेसर होते. लंडनचा मन शरीर अध्यात्म उत्सव’ (माईंड बॉडी स्पिरीट फेस्टिव्हल) तसेंच मानसिक खेळ स्पर्धा’ (माईंड स्पोर्टस ऑलिंपियाड) चे ते सहसंघटक होते.

जलदवाचन हे केवळ थोतांड आहे असे प्रथम मी गृहीत धरले आणि काही लोकांची गंमत पाहिली. मी जलद वाचन करतो असा दावा करणाऱ्या काही लोकांशी माझे त्यांना चाचपण्याएवढे फार जवळचे संबंध नाहीत तर काही लोकांचा दावा खोटा आढळला. आश्चर्य म्हणजे दोघेतिघे मात्र खरेच जलदवाचन करणारे निघाले. माझा मराठी वाचायचा साधारण वेग हा सरासरी तासाला तीसचाळीस पाने आणि इंग्रजीचा सरासरी पंधरावीस पाने एवढा आहे. म्हणजे माझा वेग सर्वसामान्य आहे. जलदवाचन करणारे मान्यवर चारशे पानांची कादंबरी केवळ दोनतीन तासात संपवणारे निघाले. त्यांनी कथानकातले तपशीलही बरोबर सांगितले. मुख्य म्हणजे हे वाचक छुपे रुस्तम आहेत. आपण काय वेगाने वाचतो याचा ते इतरांना पत्ता लागूं देत नाहीत वा गर्व किंवा अभिमानही बाळगत नाहीत. हे काय तंत्र आहे हा वेगळ्या लेखाचा विषय आहे. मला तरी ते फारसे अवगत नाही. बुझान यांच्या मते जास्त वेगाने वाचले तर वाचन जास्त परिणामकारक होते, वाचन सखोल होते आणि जास्त काळ लक्षात राहाते. अमेरिकन हवाईदलाने यावर संशोधन केले आहे. विकीपेडियावर दुवा क्र. १ इथे यावर माहिती उपलब्ध आहे. या तंत्रावर पद्धतशीर संशोधन होणे जरूरीचे आहे. जर झाले असेल तर सर्वांना उपलब्ध झाले पाहिजे. महाजालाच्या वाढत्या वेगाचा तरच सार्थ उपयोग होईल. इथे यावर माहिती उपलब्ध आहे. या तंत्रावर पद्धतशीर संशोधन होणे जरूरीचे आहे. जर झाले असेल तर सर्वांना उपलब्ध झाले पाहिजे. महाजालाच्या वाढत्या वेगाचा तरच सार्थ उपयोग होईल.
 
तरीही जास्तीत जास्त लोकांना सहज उपलब्ध होण्यासाठी व्यापारचिन्हांकित व्यवस्थेला समांतर अशा लीनक्स वगैरे संगणक आज्ञावली प्रणाल्यांची जशी निर्मिती झाली त्याप्रमाणे जलदवाचन आणि प्रज्ञारेखनापद्धतीचीही निर्मिती झाली पाहिजे. या पद्धती अस्सल म्हणजे ओरिजिनल असायला हव्यात आणि त्या व्यापारचिन्ह, एकस्व तसेच कॉपीराईट कायद्यात येणार नाहीत अशा हव्यात. मुख्य म्हणजे शिक्षणतज्ञ, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षणसंस्थाचालक या सर्वांचा आणि मुख्य म्हणजे सर्वसामान्य जनतेचा त्यात सक्रीय सहभाग असला पाहिजे. मुख्य म्हणजे पुस्तकाचे पान उभे असते तर संगणकाचा पडदा आडवा असतो. आडवा पडदा तौलनिक दृष्ट्या जास्त व्यापक माहिती मांडू शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे सर्व सर्वसामान्यांना वापरण्यासाठी भाषा वा लिपीसारखेच विनामूल्य उपलब्ध असायला पाहिजे.

पूर्वप्रकाशन:http://www.manogat.com/node/21214
                   http://misalpav.com/node/15819  

No comments:

Post a Comment