Wednesday 27 October 2010

प्रज्ञारेखन १



प्रज्ञा ही मानवाला मिळालेली एक अद्वितीय अशी जन्मजात देणगी आहे. या प्रज्ञेच्याच जोरावर माणसानें कठोर अशा निसर्गांत, वाघसिंहादी बलिष्ठ प्राण्यांना तोंड देत लाखों वर्षे तग धरला. निसर्गाच्या अनेक गूढांचा मानवानें याच प्रज्ञेच्या जोरावर शोध घेतला आहे. पृथ्वीवर राहून अनंताचा शोध घेतां घेतां त्यानें स्वतःच्या डोळ्यांनाही न दिसणाऱ्या अणुपरमाणू, सूक्ष्मजीवांचा देखील शोध घेतला. असें जरी असलें तरी आपली प्रज्ञा काय चीज आहे व आपला मेंदू नक्की कसा काय काम करतो हें गूढ अद्याप त्याला नीटसें उलगडता आलेलें नाहीं. तुलनाच करायची झाली तर चार महिन्याचें मूल आपल्या आईला बरोबर ओळखतें. बालपणींचा दहाबारा वर्षांचा तीनचार फुटी हडकुळा मित्र आपल्याला दहावीस वर्षांनंतर सहा फूट उंच आणि आडदांड होऊन भेंटला तरी आपण त्याला अचूक ओळखतों. एखाद्या व्यक्तीच्या कधींही न पाहिलेल्या भावाला, बापाला किंवा मुलाला पण आपण अंदाजानें बरोबर ओळखतों. एवढेंच काय क्रिकेट वा फुटबॉलच्या मैदानावरचा खेळाडू पाठमोरा दिसला तरी आपण त्याला शारिरिक शैलीवरून वा देहबोलीवरून अचूक ओळखतों. पण महासंगणकाला अर्थात सुपर कॉंप्यूटरलाही चेहरे ओळखणें अद्यापि नीटसें जमलेलें नाहीं. जगांतील सगळी पोलीस खातीं अशा चेहरे अचूक ओळखणाऱ्या संगणक आज्ञावलीच्या शोधांत आहेत.
 
आपल्या आयुर्वेदांत, प्राचीन ग्रीक औषधशास्त्रांत (ज्यावरून आज प्रचलित असलेलें ऍलोपॅथी नामक औषषधशास्त्र विकसित झालें आहे) मनोविकारांचा, मानसशास्त्राचा मागोवा घेतला आहे. अगदीं अलीकडे म्हणायचॅं झालें तर सिग्मंड फ्रॉईडसारख्या अनेक मान्यवर शास्त्रज्ञांनीं मनोविकारांचा मागोवा घेतला. पण मानवी प्रज्ञा काय आहे आणि विचारमंथन, निर्णय घेणें वगैरे हे या प्रज्ञेचे कार्य कसें चालतें यावर आजपर्यंत केवळ हाताच्या बोटांवर मोजतां येतील इतक्याच शास्त्रज्ञांनीं शास्त्रीय उपपत्ती (हायपोथेसिस) मांडलेली आहे. याला ठोस सिद्धांत (कॉंक्रीट थिअरी) वगैरे म्हणतां येणार नाहीं. कारण शास्त्रीय दृष्टिकोनांतून एखादी उपपत्ती ही विविध प्रयोगांनीं तीतील धूसर तसेंच वादाच्या मुद्द्यांचें पूर्ण निराकरण झाल्यानंतरच तिला सिद्धांताचा दर्जा मिळूं शकतो. तर मेंदूच्या कार्याबाबत असे प्रयत्न केवळ विसाव्या शतकात झाले. गिलफर्ड, केट फ्रॅंक, हॅंड्रिकसन, बॅरन, वालाच, कॉगन, एलिस पॉल टॉरन्स, इशिकावा, फ्रीमन, डॅनिअल गोलमन आणि आता न उल्लेखलेले असेच काही विद्वान मान्यवर इ. थोडकीच मंडळी आहेत.

आपण पाहातों कीं काहीं मुलें अभ्यासांत हुषार असतात. कांहीं खेळांत प्रवीण असतात, तर कांहींना चित्रकला, संगीत, अभिनय इ. कलांची जन्मजात देणगी असते. कांहींना सुतारकाम, सोनारकाम इ. कसब चटकन अवगत करतां येतें. कांहींत उपजत नेतृत्त्वगुण असतात. यावरून असा निष्कर्ष काढतां येतो कीं प्रज्ञा तसेंच कौशल्यें ही अनेक प्रकारची असूं शकतात आणि एका व्यक्तीला मिसर्गानें यांपैकीं एकदोन प्रज्ञा वा कौशल्यें प्रज्ञा विपुल प्रमाणांत बहाल केलेल्या असतात. डॉ. हॉवर्ड गार्डनर यांनीं ही उपपत्ती मांडली. या विषयावर इथे हॉवर्ड गार्डनर यांच्याबद्दल आणि बहुपेडी प्रज्ञेबद्दल काही मान्यवरांकडून भरपूर लेखन झालेले आहे आणि महाजालावरचे संदर्भही दिले गेले आहेत. तरी ताज्या संदर्भासाठी पुन्हा देत आहे. यात डॉ. हॉवर्ड गार्डनर यांच्या लेखनाबरोबरच इतर मान्यवरांच्या संशोधनाचा देखील उपयोग केलेला आहे. त्यामुळे कांहीं तपशील हॉवर्ड गार्डनर यांच्या जालावर उपलब्ध असलेल्या तपशीलापेक्षा थोडेसे वेगळे आढळतील.
 
१. भाषिक प्रज्ञा: ही प्रज्ञा प्रखर असलेल्या व्यक्ती भाषा विषयांत संवेदनाशील असतात. या व्यक्ती शब्दांचा वापर कौशल्यानें करून माहिती तसेंच भावना अचूक, नादमय, अर्थवाही आणि प्रवाही शब्दांत अचूकतेनें मांडूं वा व्यक्त करूं शकतात. अशा व्यक्ती कवी, लेखक तसेंच उत्तम व्याख्याते किंवा वकील होऊं शकतात.

२. तार्किक तसेंच गणिती प्रज्ञा: या व्यक्ती एखाद्या समस्येला तार्किक विश्लेषण करून सामोरें जातात, समीकरणें वा प्रमेयें सोडविण्यासारख्या गणिती क्रिया सहज करूं शकतात. अशा व्यक्ती बहुधा विज्ञानांत, गणितात व संशोधनक्षेत्रांत प्रवीण असतात.

३. संगीतविषयकप्रज्ञा: या व्यक्तींना विविध ध्वनी, स्वर, स्वरांचे बारकावे, ताल इ. सहज समजून घेतां तसेंच स्वरताल रचना समजून घेतां तसेंच रचतां येतात. इतरांच्या ध्यानांतून निसटणारे आवाज यांना व्यवस्थित ऐकूं येतात. या व्यक्ती संगीताचा आस्वाद चांगल्या तऱ्हेनें घेऊं शकतात तसेंच संगीतरचना तसेंच संगीत आयोजन (कॉंपोझ ऑर कंडक्ट म्यूझिक) चांगल्या तऱ्हेनें करूं शकतात.  
 
४. देहप्रज्ञा वा शारीर प्रज्ञा: यांचें शरीर, शारीरिक हालचाली आणि मेंदू यांतील समन्वय उत्कृष्ट असतो. शारीरिक कौशल्य वापरून विविध प्रश्न सोडविण्याकडे या व्यक्तींचा कल असतो. विविध शारीरिक खेळ, कसरती, क्रीडाप्रकार, मूकाभिनय, अभिनय, सुतारकाम, लोहारकाम, सोनारकाम, कुंभारकाम, चित्रकला, विविध हस्तकला-कौशल्यें इ. मधील कौशल्य या व्यक्ती सहज आत्मसात करतात.
 
५. अवकाशप्रज्ञा: यांना अवकाश, वस्तूंचे त्रिमिती आकार, एखाद्या जागेचा आकार, वस्तूंच्या रचना इ. ची उत्तम जाण असते. अशा व्यक्ती स्थापत्य, नगररचना, घरबांधणी, गृहसजावट, यांत प्राविण्य मिळवितात. उत्तम मूर्तिकार, स्थापत्यशास्त्रज्ञ, रचनाकार अभियंता (डिझाईन इंजिनीअर), आरेखक (ड्राफ्टसमन), होऊं शकतात.

६. जनसंपर्कीय प्रज्ञा: या व्यक्ती विविध स्वभावाच्या लोकांशीं सहज संपर्क साधूं शकतात, त्यांच्या भावना समजूं शकतात, लोकांना एखादें कार्य करण्यास प्रवृत्त करूं शकतात. यांच्याकडे उत्तम संघटना कौशल्य असूं शकतें. या व्यक्ती चांगल्या जनसंपर्क अधिकारी, मनुष्यबळ अधिकारी (एच आर ऑफिसर), टीम लीडर, राजकीय नेते वा पुढारी, समाजसेवक, समाजसुधारक वगैरे होतात.
 
७. अंतर्मुख प्रज्ञा: या व्यक्तींना स्वतःची उत्तम ओळख असते, स्वतःचे गुण, वैगुण्यें बलस्थानें तसेंच मर्मस्थानें ठाऊक असतात त्यामुळें फारशीं माणसें जोडली नसलीं तरी विचारवंत म्हणून गणले जातात. हेही लोक लेखक, कलावंत, वकील वगैरे होतात. मुख्य म्हणजे एखाद्या क्षेत्रात बऱ्यापैकी उच्चपद मिळवितात आणि आयुष्यात बऱ्यापैकी सुखी होतात.
 

पूर्वप्रकाशन:http://www.manogat.com/node/21214
                   http://misalpav.com/node/15819